घेरडीच्या मुख्य चौकात मुतारीचा अभाव; महिला नागरिकांची मोठी गैरसोय! पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बाजूचा आधार घेण्याची वेळ;

सांगोला विशेष प्रतिनिधी : विकास गंगणे
मो.9881583935
सांगोला तालुक्यातील घेरडी गावातील मुख्य चौकात सार्वजनिक मुतारीची सुविधा नसल्याने महिला नागरिकांसह प्रवासी, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. घेरडी हा जिल्हा परिषद गटातील महत्त्वाचा परिसर असून, गावातील मुख्य चौकात नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. याच चौकातून सांगोला, जत आणि मंगळवेढा या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. तसेच या ठिकाणी एसटी बस थांबत असल्याने प्रवाशांची सतत ये-जा असते.
मात्र, एवढ्या गजबजलेल्या चौकात सार्वजनिक मुतारीची व्यवस्था नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. विशेषतः महिला प्रवाशांना लघुशंकेसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर जागा उपलब्ध नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही वेळा नाइलाजास्तव पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बाजूचा परिसर लघुशंकेसाठी वापरावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही बाब सार्वजनिक स्वच्छता आणि महिला नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने चिंताजनक आहे.
घेरडी गावात आठवडा बाजार, बससेवा आणि विविध कामांसाठी ग्रामीण भागातून नागरिक येत असतात. बाजाराच्या दिवशी तर मुख्य चौकात मोठी गर्दी होते. अशा वेळी सार्वजनिक स्वच्छतागृह किंवा मुतारीची सुविधा नसल्यामुळे महिलांसह वृद्ध नागरिकांची विशेष गैरसोय होते.
ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष देण्याची गरज
सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देणे ही नागरिकांच्या मूलभूत गरजांपैकी एक आहे. त्यामुळे घेरडी ग्रामपंचायतीने मुख्य चौकातील योग्य जागेची पाहणी करून महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र आणि स्वच्छ मुतारीची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गावाच्या मुख्य चौकात एसटी बस थांबा, बाजारपेठ आणि तीन महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता येथे सार्वजनिक मुतारी उभारणे अत्यंत आवश्यक बनले आहे. संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन महिला नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



