साक्षीदारासाठी २०० रुपये? दुय्यम निबंधक कार्यालयातील व्यवहारांची वरिष्ठांकडून चौकशी होणार का?

सांगोला विशेष प्रतिनिधी : विकास गंगणे 9881583935
सांगोला येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांदरम्यान एजंटांचा वाढता हस्तक्षेप असल्याची चर्चा नागरिक व शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. सातबारा उताऱ्यावर जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार करताना तीन वर्षांची पीक पाहणी नोंद उपलब्ध नसल्यास संबंधितांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. काही प्रकरणांमध्ये तीन वर्षांची पीक पाहणी नोंद करून आणा किंवा सातबारा उताऱ्यावर डाळिंब पिकाची नोंद करा, त्यानंतरच खरेदी-विक्रीचा व्यवहार होईल, असे सांगितले जात असल्याची तक्रार पुढे येत आहे.
विशेष म्हणजे, एक एकर जमिनीच्या व्यवहारासाठी २५ हजार रुपये खर्च येत असल्याची चर्चा असून, हा खर्च नेमका कोणत्या कारणासाठी आणि कोणाकडे जातो, याबाबत स्पष्टता असणे आवश्यक आहे. शासनाने निश्चित केलेले शुल्क आणि इतर अधिकृत खर्च यांची माहिती कार्यालयात ठळकपणे लावण्यात आली आहे का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
याशिवाय, खरेदी-विक्रीच्या दस्तऐवजासाठी साक्षीदार म्हणून अनोळखी व्यक्ती उभी केली जात असल्याची बाबही चर्चेत आहे. संबंधित साक्षीदाराची पुरेशी ओळख व व्यवहाराशी असलेला संबंध तपासला जातो का, त्याचे आधार कार्ड केवळ ओळखपत्र म्हणून जोडले जाते का, याची पडताळणी होणे गरजेचे आहे. साक्षीदार म्हणून उभे राहण्यासाठी २०० रुपये द्यावे लागत असल्याचीही नागरिकांमध्ये चर्चा आहे. मात्र, या पैशांची मागणी कोणाकडून होते आणि त्याची अधिकृत पावती दिली जाते का, याची चौकशी होणे आवश्यक आहे.
जमीन खरेदी-विक्री हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी आणि कष्टाच्या पैशाशी निगडित अत्यंत महत्त्वाचा व्यवहार आहे. अशा व्यवहारांमध्ये नागरिकांना एजंटांवर अवलंबून राहावे लागत असेल, तर ही बाब चिंताजनक आहे. कार्यालयीन प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, पीक पाहणीची आवश्यकता आणि शासनमान्य शुल्क याबाबत नागरिकांना थेट माहिती मिळणे आवश्यक आहे.
*◼️*वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी*◼️
या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ नोंदणी अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करावी. तीन वर्षांच्या पीक पाहणीची अट कोणत्या शासन निर्णयानुसार लागू केली जाते, डाळिंब नोंदीचा आग्रह कोणत्या नियमाच्या आधारे धरला जातो, एक एकरासाठी सांगितल्या जाणाऱ्या २५ हजार रुपयांचा तपशील काय आहे आणि साक्षीदारांसाठी २०० रुपये घेतले जात असल्याच्या चर्चेत तथ्य आहे का, याची स्पष्टता जनतेसमोर आणावी.
तसेच कार्यालयातील अधिकृत शुल्काचा फलक लावून एजंटांमार्फत होणाऱ्या संभाव्य आर्थिक व्यवहारांना आळा घालावा. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही मध्यस्थाशिवाय पारदर्शक पद्धतीने खरेदी-विक्रीचे व्यवहार करता यावेत, अशी मागणी होत आहे.
आता वरिष्ठ नोंदणी विभाग या चर्चेची दखल घेऊन चौकशी करणार का? की शेतकऱ्यांना एजंटांच्या माध्यमातूनच व्यवहार करावे लागणार? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
भाग नं 3 उद्या



