दुय्यम निबंधक कार्यालयात नेमका कोणाचा कारभार? कर्मचाऱ्यांच्या संगनमतातून नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची चर्चा!
अधिकारी मॅडमचे मौन का? काही कर्मचारी आणि निवडक एजंटांच्या जवळिकीमागचे गौडबंगाल काय?

सांगोला : विशेष प्रतिनिधी विकास गंगणे
मो.9881583935
▪️भाग.नं.११▪️
सांगोला येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाज पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. जमीन खरेदी-विक्री, दस्त नोंदणी आणि इतर शासकीय कामांसाठी कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना कथितपणे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी आणि चर्चा शेतकरी वर्गातून पुढे येत आहेत. कार्यालयातील काही कर्मचारी आणि निवडक एजंट यांच्यात जवळीक असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.
कार्यालयात खरेदी-विक्रीचे दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या शेतकरी व नागरिकांना नेमकी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, त्यासाठी किती शासकीय शुल्क आकारले जाते आणि कोणत्या प्रक्रियेत किती वेळ लागतो, याची स्पष्ट माहिती मिळणे अपेक्षित आहे. मात्र, काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्ष कामकाजात मध्यस्थांची भूमिका महत्त्वाची ठरत असल्याची भावना निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काही कर्मचारी आणि निवडक एजंटांची जवळीक चर्चेत!
कार्यालयातील काही कर्मचारी विशिष्ट एजंटांच्या माध्यमातून येणाऱ्या दस्त नोंदणीच्या कामांना प्राधान्य देतात का? सर्वसामान्य नागरिकांना आणि थेट कामासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना वेगळी वागणूक दिली जाते का? काही निवडक व्यक्तींनाच कार्यालयीन कामकाजात विशेष सहकार्य मिळत असल्याच्या चर्चेमागे नेमके तथ्य काय आहे? या प्रश्नांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.
▪️अधिकारी मॅडमच्या भूमिकेकडे लक्ष!▪️
कार्यालयातील कामकाजावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांची आहे. अशा प्रकारच्या तक्रारी आणि नागरिकांमधील चर्चा त्यांच्या निदर्शनास येतात का? येत असल्यास त्यावर कोणती कारवाई केली जाते? कार्यालयातील कर्मचारी आणि बाहेरील मध्यस्थ यांच्या संबंधांबाबत प्रशासनाची भूमिका काय आहे? अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांची स्पष्टता होणे गरजेचे आहे.
‘मॅडम तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशा चर्चांना नागरिकांमध्ये वाव मिळत असेल, तर प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.
▪️सोलापूरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे!▪️
दुय्यम निबंधक कार्यालयातील मागील काही दिवसांतील तक्रारी, दस्त नोंदणी प्रक्रिया, साक्षीदारांची पडताळणी, शासकीय शुल्क आणि एजंटांच्या कथित हस्तक्षेपाची सखोल चौकशी करण्याची मागणी शेतकरी व नागरिकांमधून होत आहे.
सोलापूर येथील वरिष्ठ नोंदणी विभागाचे अधिकारी, जिल्हा मुद्रांक अधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय प्रतिनिधींनी सांगोला कार्यालयातील कामकाजाची प्रत्यक्ष तपासणी करावी. कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज, दस्त नोंदणीच्या नोंदी, शुल्क आकारणी आणि नागरिकांच्या तक्रारींची पडताळणी केल्यास वस्तुस्थिती समोर येण्यास मदत होऊ शकते.
शेतकऱ्यांचा सवाल एकच आहे : जमीन खरेदी-विक्रीसाठी शासनाच्या नियमांनुसार काम होणार की नागरिकांना मध्यस्थांच्या दारात उभे राहावे लागणार?
या संपूर्ण प्रकरणात संबंधित दुय्यम निबंधक अधिकारी, कर्मचारी आणि प्रशासनाने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी. तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करावी आणि नागरिकांना पारदर्शक, सुलभ व भ्रष्टाचारमुक्त सेवा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
▪️भाग.नं.१२ उद्या वाचा ▪️



