डिकसळच्या नाईक तलावात म्हैसाळचे पाणी सोडा!
ग्रामपंचायतीची विहीर कोरडी; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर, नागरिकांमधून पाणी सोडण्याची मागणी

सांगोला विशेष प्रतिनिधी विकास गंगणे
मो.9881583935
डिकसळ (ता. सांगोला) येथील नाईक तलावात म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्यात आल्यास गावातील ग्रामपंचायतीच्या विहिरीची पाणीपातळी वाढण्यास मदत होऊन नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. मात्र, सध्या दुष्काळी परिस्थितीत म्हैसाळ योजनेचे पाणी तलावात न आल्याने गावातील ग्रामपंचायतीची विहीर कोरडी पडली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
डिकसळ गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीच्या विहिरीचा मोठा आधार आहे. मात्र, पावसाचे प्रमाण कमी आणि म्हैसाळ योजनेचे पाणी उपलब्ध नसल्याने विहिरीतील पाणी आटले आहे. त्यामुळे आगामी काळात गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी नाईक तलावात म्हैसाळ योजनेचे पाणी सोडणे गरजेचे असल्याची चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वीच डिकसळ ग्रामपंचायतीने म्हैसाळ योजनेच्या संबंधित विभागाला नाईक तलावात पाणी सोडण्याबाबत लेखी पत्र दिले असल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप पाणी सोडण्याबाबत ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज!
गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वीच लोकप्रतिनिधींनी आणि संबंधित म्हैसाळ योजना विभागाच्या अधिकाऱ्यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नाईक तलावात म्हैसाळचे पाणी सोडल्यास ग्रामपंचायतीच्या विहिरीची पाणीपातळी वाढण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणारी संभाव्य गैरसोय टाळता येईल.
आता ग्रामपंचायतीच्या पत्राची दखल घेऊन संबंधित विभाग पाणी सोडणार का? लोकप्रतिनिधी यासाठी पुढाकार घेणार का? की डिकसळकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार? असे प्रश्न सध्या नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत.
गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा वेळेत नाईक तलावात म्हैसाळचे पाणी सोडून ग्रामपंचायतीच्या विहिरीची पाणीपातळी वाढविण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा डिकसळ ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.



