पारे गावात चोऱ्यांचे सत्र सुरूच; बेकायदेशीर दारू विक्रीलाही ऊत!
संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांचे प्रश्नचिन्ह; महिला व नागरिक उपोषणाच्या तयारीत.

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
घेरडी औट पोस्ट अंतर्गत येणाऱ्या पारे गावात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे चोरट्यांचा वावर वाढत असल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे गावात बेकायदेशीर दारू विक्रीही खुलेआम सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. मात्र या गंभीर बाबींकडे संबंधित यंत्रणेचे पुरेसे लक्ष आहे का, असा सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

गावातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, चोरीच्या घटना घडल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो. फोन लागत असतानाही काही वेळा फोन उचलला जात नसल्याची तक्रार आहे. व काही पोलीसाकडून फोन उचलून प्रतिसाद मिळतो त्यामुळे अडचणीच्या वेळी नागरिकांनी नेमके कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गावात वारंवार चोरीच्या घटना घडत असताना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि रात्रीची गस्त प्रभावीपणे राबवली जात आहे का, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
▪️बेकायदेशीर दारू विक्रीवर कारवाई कधी?▪️
पारे गावात बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. या विक्रीमुळे गावातील सामाजिक वातावरणावर परिणाम होत असल्याची भावना महिलांसह अनेक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. संबंधित विभागाने या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि नियमबाह्य व्यवसाय आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
याशिवाय, काही नागरिकांकडून संबंधित यंत्रणेतील कर्मचाऱ्यांच्या मासिक आर्थिक व्यवहारांबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. मात्र या आरोपांची स्वतंत्र चौकशी होणे ग्रामस्थांची मागणी आहे.
▪️महिला व नागरिक उपोषणाच्या तयारीत!▪️
गावातील वाढत्या चोरीच्या घटना, बेकायदेशीर दारू विक्रीच्या तक्रारी आणि अधिकाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याच्या नाराजीमुळे महिला व नागरिक आता आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून ठोस कारवाई केली नाही, तर महिला व नागरिक एकत्र येऊन उपोषण करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.
▪️वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी▪️
सांगोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी, घेरडी औट पोस्टचे संबंधित अधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने पारे गावातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करावी. चोरीच्या घटनांचा तपास वेगाने करावा, रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, बेकायदेशीर दारू विक्रीविरोधात विशेष मोहीम राबवावी आणि नागरिकांच्या तक्रारींची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
गावातील महिला आणि नागरिकांना सुरक्षित वातावरणात जगण्याचा अधिकार आहे. त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होऊ नये, हीच अपेक्षा आहे. आता वरिष्ठ अधिकारी या तक्रारींची दखल घेऊन प्रत्यक्ष कारवाई करणार की ग्रामस्थांना उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागणार, याकडे संपूर्ण पारे गावाचे लक्ष लागले आहे.



