ताज्या घडामोडी

घेरडी औट पोस्टच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांचे प्रश्नचिन्ह; संबंधित अधिकाऱ्यांची बदली करण्याची ग्रामस्थांची मागणी

▪️भाग नं.२ ▪️

सांगोला विशेष प्रतिनिधी विकास गंगणे

मो.9881583935

 

पारे गावात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, अवघ्या काही दिवसांत चार चोरीच्या घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असली, तरी चोरीच्या घटनांचा तपास नेमका कुठपर्यंत पोहोचला, चोरट्यांचा शोध कधी लागणार आणि संशयितांना अटक कधी होणार, असे प्रश्न आता ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत.

 

गावातील नागरिकांच्या घरांची, मालमत्तेची आणि सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची, असा सवालही ग्रामस्थ विचारत आहेत. वारंवार चोरीच्या घटना घडत असताना रात्रीची गस्त वाढविणे, संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवणे आणि चोरीच्या घटनांचा तपास वेगाने करणे आवश्यक आहे. केवळ घटनास्थळी पाहणी करून प्रश्न सुटणार नाही, तर प्रत्यक्षात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे.

 

दुसरीकडे, पारे गावात बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून केल्या जात आहेत. या विक्रीवर संबंधित विभागाकडून ठोस कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बेकायदेशीर दारू विक्रीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

 

विशेष म्हणजे, घेरडी औट पोस्टअंतर्गत येणाऱ्या परिसरातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी फोन केला असता फोन लागत असल्याचे सांगितले जाते; मात्र फोन उचलला जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. नागरिकांनी आपली अडचण मांडायची तरी कोणाकडे? आपत्कालीन परिस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क झाला नाही, तर सामान्य नागरिकांनी न्याय मागायचा कोणाकडे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

चार चोरीच्या घटना, बेकायदेशीर दारू विक्रीबाबतच्या तक्रारी आणि अधिकाऱ्यांशी संपर्क होत नसल्याची नागरिकांची नाराजी या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, तसेच आवश्यकतेनुसार त्यांची बदली करावी, अशी मागणी केली आहे.

 

आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पारे गावातील परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन चोरीच्या घटनांचा तपास तातडीने पूर्ण करावा, चोरट्यांना अटक करण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत आणि बेकायदेशीर दारू विक्रीच्या तक्रारींची चौकशी करावी, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

 

गावकऱ्यांना आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कारवाई हवी आहे. पारे गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून, वरिष्ठ अधिकारी या तक्रारींची दखल घेऊन काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

▪️भाग.नं.3 उद्या वाचा▪️

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??