ताज्या घडामोडी

तहसील कार्यालयासमोर वाहनांची गर्दी; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण!

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे

मो.9881583935

 

सांगोला तहसील कार्यालयासमोर दररोज दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून, यामुळे परिसरात वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. तहसील कार्यालयात विविध शासकीय कामांसाठी येणारे नागरिक, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी यांना या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

 

तहसील कार्यालयात सातबारा उतारा, फेरफार नोंदी, विविध दाखले, रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, जमीनविषयक कामे तसेच इतर शासकीय कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यामुळे कार्यालयासमोरील रस्त्यावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची गर्दी वाढते. अनेक वाहने रस्त्याच्या कडेला तसेच येण्या-जाण्याच्या मार्गावर उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.

 

विशेष म्हणजे, या परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी नियमित ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती नसल्याने वाहनचालकांना स्वतःच मार्ग काढावा लागत आहे. परिणामी, काही वेळा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक आणि पायी जाणाऱ्या नागरिकांची एकाच ठिकाणी गर्दी होत असल्याने अपघाताचा धोकाही निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

तहसील कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना विशेष अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना त्यांची मोठी तारांबळ उडत आहे. एखाद्या नागरिकाला तातडीने रस्ता ओलांडायचा असल्यासही वाहनांची गर्दी कमी होण्याची वाट पाहावी लागत आहे.

 

शासकीय कार्यालयासमोरच नागरिकांना अशा प्रकारच्या वाहतूक समस्येला सामोरे जावे लागत असेल, तर संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. तहसील कार्यालय परिसरात वाहनांसाठी शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्था करणे, नो-पार्किंग क्षेत्र निश्चित करणे, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे आणि गर्दीच्या वेळेत वाहतूक पोलिसांची नियुक्ती करणे आवश्यक आहे.

 

प्रशासनाने एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तहसील कार्यालयासमोरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार तरी कधी, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??