ताज्या घडामोडी

डिकसळ गावठाणातील महावितरणचा फ्युज बॉक्स उघडाच; लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!

उघड्या वीज बॉक्समुळे अपघाताची भीती; बॉक्सला सुरक्षित दरवाजा व लॉक बसविण्याची ग्रामस्थांची मागणी

सांगोला विशेष प्रतिनिधी  

विकास गंगणे

मो.9881583935

 

डिकसळ (ता. सांगोला) येथील गावठाण परिसरात महावितरणच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरखाली असलेला फ्युज बॉक्स उघड्या अवस्थेत असल्याने ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बॉक्सला दरवाजा आणि सुरक्षित लॉक नसल्यामुळे त्यातील फ्युजपर्यंत कोणालाही सहज पोहोचता येत आहे. त्यामुळे अनधिकृतपणे फ्युज काढणे, वीजपुरवठा खंडित करणे तसेच विद्युत यंत्रणेत विनापरवानगी हस्तक्षेप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

विशेष म्हणजे, या परिसरातून लहान मुले आणि नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. उघड्या बॉक्समधील विद्युत उपकरणे आणि फ्युज यांना अनवधानाने हात लागल्यास गंभीर अपघात घडण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ वीजपुरवठ्यापुरता मर्यादित नसून नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षिततेशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे.

 

महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरखालील फ्युज बॉक्स व्यवस्थित बंदिस्त असणे आवश्यक असताना तो उघडा असल्याने संबंधित यंत्रणेने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. बॉक्सला मजबूत दरवाजा बसवून त्याला कायमस्वरूपी लॉक लावण्यात यावे. तसेच बॉक्सची तांत्रिक तपासणी करून परिसरातील संभाव्य विद्युत धोके दूर करावेत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

 

एखादी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यापूर्वीच महावितरणने खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे संबंधित महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून फ्युज बॉक्स सुरक्षित करावा, अशी अपेक्षा डिकसळ ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??