आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांना यश; सांगोला पोलीस वसाहतीचा प्रश्न मार्गी लागणार!
पोलीस स्टेशन व निवासस्थानाच्या नवीन इमारतीसाठी शासनाची सकारात्मक भूमिका; प्रकल्पाचा प्राधान्यक्रम यादीत समावेश.

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
सांगोला येथील पोलीस वसाहतीच्या दुरवस्थेचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, सांगोला पोलीस स्टेशन व पोलीस निवासस्थानाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा प्रकल्प शासनाच्या प्राधान्यक्रम यादीत समाविष्ट करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात लेखी उत्तर देत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या या प्रश्नाच्या अनुषंगाने आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कपात सूचनेद्वारे शासनाचे लक्ष वेधले होते. सांगोला येथील पोलीस वसाहतीची दुरवस्था लक्षात घेता पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा असलेली निवासस्थाने उपलब्ध करून देण्यासाठी नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली होती.
या मागणीला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, गृह विभागाच्या २१ एप्रिल २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आलेल्या प्राधान्यक्रम यादीमध्ये पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या अंतर्गत सांगोला पोलीस स्टेशन व निवासस्थान बांधकाम प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे.
तसेच, या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून, प्रकल्पाचे संकल्पन नकाशे व आराखडे तयार करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे.
पोलीस अधिकारी व कर्मचारी अहोरात्र जनतेच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असतात. मात्र, त्यांच्यासाठी पुरेशी आणि सुविधायुक्त निवासस्थाने उपलब्ध असणेही तितकेच आवश्यक आहे. सांगोला येथील पोलीस वसाहतीची झालेली दुरवस्था पाहता नवीन पोलीस वसाहत आणि पोलीस स्टेशनच्या इमारतीची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आता या प्रकल्पाला शासनस्तरावर सकारात्मक दिशा मिळाली आहे.
आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांना मिळालेले हे यश सांगोल्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. आता प्रकल्पाचे आराखडे लवकरात लवकर पूर्ण करून आवश्यक निधीची तरतूद करावी आणि प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



