सांगोला दुय्यम निबंधक कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट?
विक्रेत्यांना मोठा आर्थिक भुर्दंड; शासनमान्य बॉण्ड रायटरला डावलल्याची नागरिकांची तक्रार भाग नं.९

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.९८८१५८३९३५
सांगोला येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाबाबत सध्या नागरिक आणि शेतकरी वर्गातून विविध तक्रारी पुढे येत आहेत. जमीन खरेदी-विक्रीच्या दस्त नोंदणीसाठी कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याची चर्चा आहे. कार्यालयात शासनमान्य बॉण्ड रायटर उपलब्ध असतानाही प्रत्यक्ष कामकाजात खाजगी एजंटांचा हस्तक्षेप अधिक असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
जमीन खरेदी-विक्री, दस्त तयार करणे, नोंदणी प्रक्रिया तसेच इतर कागदपत्रांच्या कामांसाठी नागरिकांना एजंटांचा आधार घ्यावा लागत असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रक्रियेत काही खाजगी मध्यस्थांकडून नागरिकांकडे जादा रकमेची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकरी आणि जमीन विक्रेत्यांना अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागत आहे.
शासनमान्य बॉण्ड रायटरला डावलले जात असल्याची चर्चा
शासनमान्य बॉण्ड रायटर असताना खाजगी एजंटांमार्फतच बहुतांश कामे होत असल्याची बाब चर्चेत आहे. अधिकृत पद्धतीने काम करण्याची सुविधा असतानाही नागरिकांना खासगी मध्यस्थांकडे का जावे लागते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कार्यालयात कोणत्या कामासाठी किती अधिकृत शुल्क आकारले जाते, याची स्पष्ट माहिती दर्शनी भागात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयाच्या प्रशासनाची भूमिका काय?
सांगोला दुय्यम निबंधक कार्यालयात महिला अधिकारी दुय्यम निबंधक पदावर कार्यरत आहेत. मात्र, नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कार्यालयातील कामकाजाबाबतच्या तक्रारी आणि अडचणींकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची भावना निर्माण झाली आहे. नागरिकांना योग्य मार्गदर्शन, पारदर्शक सेवा आणि तक्रारींचे निराकरण मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या तक्रारींची दखल घेऊन वस्तुस्थितीची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे
सांगोला दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाजाची सखोल तपासणी करून अधिकृत शुल्काचे दर, खाजगी एजंटांचा हस्तक्षेप, शासनमान्य बॉण्ड रायटरची भूमिका आणि नागरिकांकडून आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त रकमेबाबत चौकशी करावी. तसेच दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात आपले काम करून घेण्यासाठी कोणत्याही खाजगी मध्यस्थावर अवलंबून राहावे लागू नये, हीच अपेक्षा आहे. आता सांगोला दुय्यम निबंधक कार्यालयातील या तक्रारींबाबत जिल्हा मुद्रांक अधिकारी आणि वरिष्ठ नोंदणी विभाग कोणती भूमिका घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
▪️भाग नं.१० उद्या वाचा.▪️



