ताज्या घडामोडी

घेरडी परिसरात समस्यांचा डोंगर; अधिकार नेमके कोणाच्या प्रतीक्षेत.. ▪️भाग.नं.५▪️

सांगोला विशेष प्रतिनिधी : विकास गंगणे

 

 

घेरडी (ता. सांगोला) पोलीस बीटअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये सध्या विविध समस्या गंभीर बनत असल्याची चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे. काही गावांमध्ये चोरीच्या घटना, भांडण-तंटे, बेकायदेशीर दारू विक्री यांसारख्या प्रश्नांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे घेरडी येथे दर सोमवारी भरणाऱ्या आठवडा बाजाराच्या दिवशी बसस्थानकासमोर वाहनांची मोठी गर्दी होत असून वाहतुकीचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

 

विशेष म्हणजे, या सर्व प्रश्नांबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. मात्र, नागरिकांच्या तक्रारी आणि सार्वजनिक समस्यांवर तातडीने प्रतिसाद मिळत नसल्याची नाराजी काही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 

एकीकडे चोरीच्या घटनांचा तपास, भांडण-तंट्यांवर नियंत्रण आणि अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई करण्याची मागणी होत असताना, काही मोठ्या व्यावसायिकांशी फोनवर संवाद साधण्यासाठी मात्र वेळ दिला जात असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. या चर्चेची वस्तुस्थिती संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट करणे आवश्यक आहे.

 

**सोमवारी बसस्थानक परिसरात वाहतुकीचा बोजवारा**

 

घेरडी येथे सोमवारी आठवडा बाजार भरत असल्याने परिसरातील नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि वाहनधारकांची मोठी गर्दी होते. बसस्थानकासमोरच वाहनांची वर्दळ वाढत असल्याने प्रवाशांना, पादचाऱ्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बाजाराच्या दिवशी वाहतूक नियोजनासाठी योग्य उपाययोजना आणि आवश्यक बंदोबस्त असावा, अशी मागणी होत आहे.

 

▪️पोलीस निरीक्षकांनी लक्ष घालण्याची मागणी▪️

 

घेरडी व परिसरातील गावांमधील कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न, चोरीच्या घटनांचा तपास, अवैध दारू विक्रीवर कारवाई तसेच आठवडा बाजारातील वाहतूक कोंडी या सर्व बाबींची पोलीस निरीक्षकांनी गांभीर्याने दखल घ्यावी. संबंधित बीटमधील कामकाजाचा आढावा घेऊन नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

 

नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि सार्वजनिक व्यवस्थेला प्राधान्य देणे ही संबंधित यंत्रणेची जबाबदारी आहे. त्यामुळे केवळ तक्रारींची नोंद न घेता प्रत्यक्ष कारवाई कधी होणार, असा सवाल आता घेरडीसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

▪️भाग नं.६ उद्या वाचा ▪️

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??