ग्रामीण प्रवाशांना एसटीची प्रतीक्षा किती दिवस? सतीश साळुंखे मेस्त्री आगारप्रमुखांच्या भेटीला

सांगोला विशेष प्रतिनिधी :
विकास गंगणे
मो.9881583935
जत आगारातून दुपारी ३ वाजल्यानंतर वायफळ, डिकसळ, घेरडी, जवळा मार्गे सांगोल्याकडे जाण्यासाठी पुरेशी एसटी बससेवा उपलब्ध नसल्याने या मार्गावरील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, नोकरदार वर्ग तसेच ग्रामीण भागातून सांगोल्याला येणाऱ्या प्रवाशांची यामुळे अडचण होत आहे.
दुपारी ३ नंतर सांगोल्याकडे जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याने अनेक प्रवाशांना तासनतास बसची प्रतीक्षा करावी लागते. काही वेळा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून, त्यामुळे प्रवासाचा अतिरिक्त खर्चही सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी बस ही महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असताना वेळापत्रकातील या अडचणीमुळे प्रवाशांचे दैनंदिन नियोजन विस्कळीत होत आहे.
या गंभीर समस्येची डिकसळ गावचे, जिल्हा अध्यक्ष सोलापूर शिवशक्ती कामगार वाहतूक सेना व सामाजिक कार्यकर्ते तथा डागुर समाज संघटनेचे अध्यक्ष **सतीश साळुंखे मेस्त्री** यांनी दखल घेतली आहे. त्यांनी सांगोला एसटी आगारप्रमुखांची भेट घेऊन या मार्गावरील बससेवेच्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच जत आगारातून दुपारी ३ नंतर सांगोल्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी योग्य बससेवा उपलब्ध व्हावी, यासाठी संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या मार्गावरील प्रवाशांची संख्या आणि त्यांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन एसटी महामंडळाने बसफेऱ्यांचे नियोजन करणे आवश्यक आहे. विशेषतः शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता दुपारी ३ नंतर किमान एक-दोन अतिरिक्त बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
संबंधित जत व सांगोला एसटी आगार प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन वायफळ, डिकसळ, घेरडी, जवळा मार्गे सांगोल्याकडे नियमित बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा परिसरातील प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागातील प्रवाशांना वेळेवर आणि नियमित एसटी सेवा मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



