आपला जिल्हा

वाकी(शिवणे) कारखाना येथे युवा सेनेचे पदाधिकारी बेमुदत आमरण उपोषण.

चेअरमन अभिजीत पाटील यांचे कडून पंढरपूरच्या शेतकऱ्याला तुपाशी,तर सांगोलच्या शेतकऱ्यांना उपाशी. 

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी ऊसाचा पहिला हप्ता प्रतिटन ३ हजार रुपये जाहीर केला असताना, धाराशिव साखर कारखाना लि. वाकी (शि) युनिट क्रमांक ४ (ता. सांगोला) यांनी मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर केवळ २ हजार ८०० रुपयेच जमा केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना सांगोला तालुकाप्रमुख सुभाष भोसले यांनी सोमवार दि.५ जानेवारी रोजी सकाळी १० पासून धाराशिव साखर कारखाना यु. क्र. ४,वाकी येथे आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

 

या उपोषणाला महूद ग्रामपंचायतीच्या सरपंच संजीवनी दुबाळ तसेच वाकी (शि) ग्रामपंचायतीकडून लेखी पाठिंब्याचे पत्र देण्यात आले आहे.याशिवाय उबाठा युवासेनेचे जिल्हाप्रमुख गणेश इंगळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख रघुनाथ गायकवाड, शिवसेना (एकनाथ शिंदे )तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, ॲड. मारुती ढाळे, बाळासाहेब ढाळे, कल्याण लुबाळ,जितेंद्र बाजारे, अशोक येडगे, संतोष पाटील, संतोष उसमळे, शंकर पाटील, नाना गाढवे, विकास रोकडे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी या आमरण उपोषणास पाठिंबा दिला आहे.

 

जोपर्यंत धाराशिव साखर कारखाना, वाकी-शिवणे युनिट क्रमांक ४ कडून ऊसाचा पहिला हप्ता प्रतिटन ३ हजार रुपये दिला जात नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा ठाम इशारा युवासेना तालुकाप्रमुख सुभाष भोसले व तालुका समन्वयक शंकर मेटकरी यांनी दिला आहे. तसेच दुपारी कारखाना संचालक व कर्मचारी यांनी उपोषणकर्त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.परंतु उपोषणकर्त्यांना ते मान्य न झाल्याने ते उपोषणावर ठाम राहिले आहेत.

 

यावेळी उपोषणकर्त्यांनी सांगितले की, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने ऊसाचा पहिला हप्ता प्रतिटन ३ हजार १ रुपये जाहीर केला असून, त्या कारखान्याचा ऊस धाराशिव साखर कारखान्याच्या यु. क्र. ४ वाकी येथेच गाळपासाठी येतो. त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३ हजार १ रुपयांचा पहिला हप्ता दिला जात असताना, सांगोला तालुका व परिसरातील शेतकऱ्यांना मात्र केवळ २ हजार ८०० रुपयेच देण्यात येत आहेत. हा दुजाभाव का? सांगोल्यातील शेतकऱ्यांवर अन्याय का? असा सवाल उपस्थित करण्यात आला.

 

दरम्यान, खासदार धर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या पक्षातील आमदार सध्या सदर साखर कारखाना चालवत असल्याने, त्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा व संबंधितांना योग्य निर्णय घेण्यास भाग पाडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी जोरदार मागणी युवासेना तालुकाप्रमुख सुभाष भोसले यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??