शक्तीपीठ महामार्गावर सर्वसमावेशक तोडग्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार ; मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील
शक्तीपीठ समर्थनार्थ आंदोलनकर्त्यांची घेतली भेट

सांगोला/विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
दुष्काळी भागांचा सर्वांगीण विकास, राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणारे मजबूत दळणवळण जाळे आणि ग्रामीण भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नागपूर–गोवा शक्तीपीठ महामार्ग हा राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या महामार्गावरून संघर्ष उभा न राहता कोणत्याही दुष्काळी तालुक्यावर अन्याय न करता मूळ महामार्गाचा अरेखान कायम ठेऊन प्रस्तावित असणारा महामार्गही करावा यामुळे सर्व दुष्काळी भागातील जनतेला दिलासा मिळेल, असा सर्वसमावेशक तोडगा काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व पालकमंत्री जयकुमारभाऊ गोरे यांच्याशी लवकरच चर्चा करणार असल्याची माहिती माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून ओळखला जाणारा नागपूर–गोवा शक्तीपीठ महामार्गाचा मूळ आराखडा ७ मार्च २०२४ पूर्वी निश्चित करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार भूसंपादन सुमारे ८० ते ९० टक्के मोजणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपूर व सांगोला तालुक्यातील बाधित २१ गावांतील शेतकऱ्यांनी मूळ आरेखनात कोणताही बदल न करता ते पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्याची ठाम भूमिका घेतली आहे. या मागणीसाठी शक्तीपीठ समर्थन समिती तसेच बाधित शेतकऱ्यांच्या वतीने गुरुवार, १ जानेवारीपासून सांगोला तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनस्थळी माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी सविस्तर संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी, भावना व मागण्या जाणून घेतल्या.
यावेळी बोलताना माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली रस्ते परिवहन मंत्री नितीनजी गडकरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व अजितदादा पवार यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यामुळे राज्यात सर्वत्र महामार्गाचे मोठे जाळे उभे राहिले आहे. यामुळे दुष्काळी भागातील दळणवळण गतिशील झाले आणि विकासकामांना गती आली आहे. त्यामुळे “तुझं–माझं करत आपसात भांडण्यापेक्षा व्यापक दृष्टीकोनातून विचार करण्याची गरज आहे. धाराशिवपासून जुन्या आणि नव्या अशा दोन्ही आरेखानानुसार वेगवेगळ्या दिशेने या महामार्गाचे काम सुरू करून कोल्हापूरजवळ त्यांचे एकत्रीकरण केल्यास सर्व प्रमुख तीर्थक्षेत्रे महामार्गाशी जोडली जातील यामुळे माण पट्ट्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागांचा विकास, पर्यटनवाढ, व्यापारवृद्धी आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल.” शक्तीपीठ महामार्ग हा केवळ रस्ता नसून दुष्काळी भागाच्या विकासाचा कणा असल्याचे सांगत दिपकआबा साळुंखे पाटील यांनी या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. लवकरच जिल्ह्यातील सर्व आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व पालकमंत्री जयकुमारभाऊ गोरे यांच्याशी सखोल चर्चा करून धाराशिवपासून दोन वेगवेगळ्या दिशेने शक्तीपीठ महामार्ग सुरू करून कोल्हापूरजवळ एकत्रित करण्यासाठी ठोस आणि परिणामकारक प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिले.
चौकट ;
आजी माजी लोकप्रतिनिधी आणि बाधित शेतकऱ्यांना एकत्रित करणार
राज्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी मूळ आरेखन आणि बदललेले आरेखन अशा दोन्ही भागातील आजी माजी लोकप्रतिनिधी तसेच या प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्रित करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत व्यापक बैठक घेऊन मूळ आरेखन कायम ठेऊन नव्याने प्रस्तावित असणाऱ्या आरेखनानुसार दोन्ही मार्गाने हा महामार्ग करावा आणि शक्तीपीठ महामार्गावरून सुरू असणारा गोंधळ दूर करावा. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील आणि माण पट्ट्यातील दुष्काळी तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी स्पष्ट केले.



