ताज्या घडामोडी

अनधिकृत भोंगे काढून न घेतल्यास, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, पो.नि.विनोद घुगे

सांगोला विशेष प्रतिनिधी  

विकास गंगणे 

मो.9881583935

 

माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धार्मिक स्थळांवरील ध्वनीप्रणाली (स्पीकर/भोंगे) संदर्भात सांगोला पोलीस प्रशासनाने पुढाकार घेत महत्त्वाची बैठक आयोजित केली. धार्मिक स्थळांवर बसविण्यात आलेल्या अनधिकृत भोंग्यांबाबत तसेच ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

दि. ४ मार्च २०२६ रोजी दुपारी १२.४५ ते १.३० या वेळेत सांगोला पोलीस ठाण्यात ही बैठक पार पडली. या बैठकीस सांगोला शहर व परिसरातील विविध मंदिरांचे पुजारी, ट्रस्टी, मशिदीचे मौलाना तसेच विविध धार्मिक स्थळांचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्व धर्मीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची माहिती देत त्यानुसार आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.

 

बैठकीत धार्मिक स्थळांवर बसविण्यात आलेले अनधिकृत स्पीकर व भोंगे काढून घेण्याबाबत पोलीस प्रशासनाने स्पष्ट सूचना दिल्या. तसेच ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक कायद्याचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

 

यावेळी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी उपस्थित सर्व धर्मीय प्रतिनिधींना संबोधित करत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन केले. धार्मिक स्थळांवरील ध्वनीप्रणाली वापरताना शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच निश्चित मुदतीत अनधिकृत भोंगे काढून न घेतल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

 

दरम्यान, बैठकीत उपस्थित सर्व धार्मिक स्थळांच्या प्रतिनिधींनी पोलीस प्रशासनाच्या सूचनांना सकारात्मक प्रतिसाद देत स्पीकर काढण्याबाबत कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शविली.

 

या बैठकीमुळे सांगोला शहरात धार्मिक सौहार्द कायम ठेवत ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांच्या शांतता व आरोग्याच्या दृष्टीने ध्वनी प्रदूषण नियंत्रणात ठेवणे आवश्यक असून, यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

 

पोलीस प्रशासनाने सांगितले की, आगामी काळात धार्मिक स्थळांवरील ध्वनीप्रणालीबाबत नियमांचे पालन होत आहे की नाही याची नियमित तपासणी करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन आढळल्यास कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??