ताज्या घडामोडी

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नूतन सभापती आणि उपसभापती स्वीकारणार पदभार 

माजी आमदार शहाजीबापू आणि दिपकआबांच्या उपस्थितीत संपन्न होणार पदग्रहण सोहळा 

सांगोला ; विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि गेली ५५ वर्षे शेकापची सत्ता असलेल्या सांगोला पंचायत समितीवर भाजप महायुतीने आपला झेंडा फडकवला आहे. सांगोला पंचायत समितीच्या भाजपच्या नूतन सभापती पूनम इंगवले आणि शिवसेनेचे उपसभापती अजय सरगर हे मराठी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर गुरुवार दि १९ मार्च रोजी दु. १. वा. गुढीपाडव्याला आपला पदभार स्वीकारणार आहेत. 

तब्बल सलग ५५ वर्षे सांगोला पंचायत समितीवर शेतकरी कामगार पक्षाने आपली एकहाती सत्ता राखली होती. मात्र यंदा प्रथमच सांगोल्याच्या राजकारणातील “जय विरु” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी आमदार शहाजीबापू आणि दिपकआबांनी एकत्रित येऊन शेकापला धक्का देत पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा फडकवला. सभापती आणि उपसभापती दोन्ही महत्त्वाची पदे महायुतीकडे आल्याने सांगोला तालुक्यातील माजी आमदार शहाजीबापू आणि दिपकआबांच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. 

 

गुरुवारी होणाऱ्या या पदग्रहण सोहळ्याला सांगोला विधानसभेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, भाजपचे नेते बाळासाहेब एरंडे, भाऊसाहेब रुपनर, आर पी आयचे खंडू सातपुते आदीसह महायुतीचे पदाधिकारी आणि नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. नूतन सभापती आणि उपसभापती पदग्रहण सोहळ्यासाठी जिल्हा परिषद सदस्य, सांगोला पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व विजयी आणि पराभूत उमेदवार तसेच ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, तसेच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थितीत रहावे असे आवाहन शिवसेनेचे तालुका अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे, मधुकर बनसोडे, भाजपचे तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर आणि दादा खरात यांचे यांनी केले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??