महुदमध्ये,अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई, गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
सांगोला तालुक्यातील महुद परिसरात अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने मोठी धडक कारवाई करत विविध पानटपऱ्या आणि किराणा दुकानांवर छापे टाकले. या कारवाईत शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू, स्वीट सुपारीसह विविध अन्नपदार्थांचा ८ हजार ४७२ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री व साठवणूक केल्याप्रकरणी सहा दुकानदारांसह तीन पुरवठादार अशा एकूण नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित दुकाने पुढील आदेशापर्यंत सीलबंद करण्यात आली आहेत.
अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, सोलापूर येथील अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश मल्हारी लवटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या पथकासोबत पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कारवाईदरम्यान आशियाना पान शॉप, हिंदुस्तान पान शॉप, भवानी पान शॉप, तारा पान शॉप, स्वप्नाली किराणा स्टोअर्स आणि शाम किराणा अँड जनरल स्टोअर्स या दुकानांची तपासणी करण्यात आली. तपासणीत फिलिंग स्वीट सुपारी, चंदन स्वीट सुपारी, विमल पानमसाला, डायरेक्टर पानमसाला, आरएमडी पानमसाला, सुपरजेम पानमसाला, व्ही-१ सुगंधित तंबाखू, काश्मिरी सुगंधी तंबाखू, शॉट ९९९ तंबाखू, चैनी प्रीमियम फिल्टर पाऊच यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा विक्रीसाठी ठेवलेला आढळून आला.
अधिकाऱ्यांनी सर्व प्रतिबंधित पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी वेगळे काढून उर्वरित संपूर्ण साठा जप्त केला. तसेच संबंधित दुकानांमध्ये पुन्हा प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री होऊ नये म्हणून सर्व दुकाने पुढील आदेशापर्यंत सीलबंद करण्यात आली.
चौकशीदरम्यान बहुतांश दुकानदारांनी हा माल दिघंची (ता. आटपाडी, जि. सांगली) येथील असिफ तांबोळी, जुबेर तांबोळी आणि नईम तांबोळी यांच्याकडून किरकोळ विक्रीसाठी खरेदी केल्याचे सांगितले. मात्र कोणाकडेही खरेदीची अधिकृत बिले उपलब्ध नव्हती.
या प्रकरणात मुस्ताक बाबू मुलाणी, बबलू मुबारक मुलाणी, संतोष हणमंत काटकर, यासीन अल्लाउद्दीन तांबोळी, प्रतिक जनार्दन हजारे, शाम औदुंबर भोसले या दुकानदारांसह असिफ तांबोळी, जुबेर तांबोळी आणि नईम तांबोळी या पुरवठादारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्वांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील विविध कलमांसह भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३, २७४, २७५, १२३ आणि ३(५) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थांचा मूळ स्रोत, पुरवठा साखळी आणि संबंधित दुकानांचे प्रत्यक्ष मालक यांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू असून, जप्त केलेला मुद्देमाल अन्न व औषध प्रशासन कार्यालय, सोलापूर येथे जमा करण्यात आला आहे.
महुद परिसरात झालेल्या या धडक कारवाईमुळे प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.



