आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत नीरा उजवा कालव्याचे आवर्तन १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू ठेवण्याची केली मागणी

सांगोला विशेष प्रतिनिधी/
विकास गंगणे
मो.९८८१५८३९३५
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी वीर धरणातून नीरा उजवा कालव्याच्या खरीप हंगाम २०२६-२७ च्या सिंचन आवर्तनाबाबत महत्त्वपूर्ण मागणी केली.
यावर्षी सांगोला तालुक्यासह पंढरपूर तालुक्यातील संबंधित कार्यक्षेत्रात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज निर्माण झाली आहे. सांगोला मतदारसंघातील चिंचोली तलाव तसेच तिसंगी व सोनके येथील तलाव यांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे असून सदर भागातील उभी पिके वाचविण्यासाठी तसेच आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता, नीरा उजवा कालव्याचे सध्या सुरू असलेले आवर्तन वेळेपूर्वी बंद न करता दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस यांना सांगितले.
शेतकरी व नागरिकांच्या हिताचा विचार करून वीर धरणातून नीरा उजवा कालव्याचे खरीप हंगाम २०२६-२७ चे आवर्तन १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सुरू ठेवण्याबरोबरच तिसंगी, सोनके (ता. पंढरपूर) आणि चिंचोली तलाव (ता. सांगोला) येथे आवश्यकतेनुसार पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश देण्यात यावेत अशी मागणी केली.
मुख्यमंत्री महोदयांनी आमदारांची मागणी गांभीर्याने ऐकून घेतली असून याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. दुष्काळी परिस्थितीमुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या पाणीपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ही मागणी महत्त्वाची मानली जात आहे.



