ताज्या घडामोडी

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे चारा छावण्या सुरू करण्याची मागणी

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.९८८१५८३९३५

 

सांगोला विधानसभा मतदारसंघात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने जनावरांसाठी तातडीने चारा छावण्या सुरू करण्याची मागणी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आज मंत्रालय येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. 

डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सांगोला तालुक्यातील सध्याची गंभीर परिस्थिती सविस्तर मांडली. यंदा पावसाच्या दीर्घ खंडामुळे आणि अपुऱ्या पर्जन्यमानामुळे तालुक्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके वाया जात असून, जनावरांसाठी चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना मोठा फटका बसण्याची भीती आहे. सांगोला मतदारसंघात जनावरांसाठी चारा छावण्या तातडीने सुरू केल्या जाव्यात. त्यासाठी आवश्यक निधी, चारा पुरवठा आणि व्यवस्थापन यंत्रणा उभी करण्यात यावी. दुष्काळ निवारणाच्या इतर उपाययोजनांसोबतच पशुधनाच्या संरक्षणाला प्राधान्य देण्याची विनंती त्यांनी केली. सोलापूर जिल्ह्यात अलीकडेच दुष्काळ जाहीर झाल्यानंतर चारा वाहतुकीवर निर्बंध आल्याने स्थानिक पातळीवर छावण्यांची गरज अधिक तीव्र झाली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेतली असून राज्यात सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असून, पिण्याचे पाणी आणि जनावरांचा चारा यांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी यापूर्वीही स्पष्ट केले आहे.

सांगोला तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढल्यास शेतीसोबतच पशुधनही धोक्यात येऊ शकते. चारा छावण्या सुरू झाल्यास जनावरांना दिलासा मिळेल आणि शेतकऱ्यांना आर्थिक बोजा कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांनी केलेल्या या मागणीबाबत मुख्यमंत्री महोदयांनी यावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??