सराईत गुन्हेगार शरद कोळी यास MPDA अंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबद्ध
सोलापूर ग्रामीण पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; सांगलीतून घेतले ताब्यात

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर पोलिसांनी MPDA कायद्यान्वये कारवाई केली आहे. शरद विठ्ठल कोळी, रा. अर्धनारी, ता. मोहोळ, जि. सोलापूर यास स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी दिल्यानंतर त्यास ताब्यात घेऊन येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल वि. कुलकर्णी यांनी जिल्ह्यात शरीराविरुद्ध तसेच मालमत्तेविरुद्ध वारंवार गुन्हे करणाऱ्या आणि सर्वसामान्य नागरिकांना उपद्रव निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हेगारी कृत्यांना आळा बसावा, नागरिकांमध्ये शांतता व सुरक्षिततेचे वातावरण राहावे आणि सराईत गुन्हेगारांच्या कारवायांवर नियंत्रण मिळवता यावे, यासाठी पोलिसांकडून अशा कारवाया सुरू आहेत.
९ गंभीर गुन्हे दाखल
पोलीस माहितीनुसार, शरद कोळी याच्यावर खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, घातक हत्याराचा वापर करून इच्छापूर्वक दुखापत करणे, जबरी चोरी यांसह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पंढरपूर तालुका, सांगोला, कामती, मंगळवेढा आणि मंद्रुप पोलीस ठाण्यांच्या हद्दीत त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल असून, सोलापूर जिल्ह्याबाहेर नांदेड आणि जळगाव जिल्ह्यांतही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
एकूण ९ गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यापूर्वीही त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही पुन्हा गुन्हेगारी कृत्ये केल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
MPDA प्रस्ताव सादर
शरद कोळीच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लवार यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे MPDA कायद्यान्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला.
या प्रस्तावाची जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्तिकेयन यांनी पडताळणी केल्यानंतर शरद कोळी यास MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले.
सांगलीतून ताब्यात
स्थानबद्धतेचे आदेश जारी झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या पथकाने शरद कोळीचा शोध सुरू केला. पोलिसांनी त्याचा शोध घेत सांगली जिल्ह्यातून त्यास ताब्यात घेतले.
त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी त्यास पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शरद कोळी यास पुढील स्थानबद्धतेसाठी येरवडा कारागृहात जमा करण्यात आले.
सराईत गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच
सोलापूर ग्रामीण पोलीस हद्दीत शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या तसेच वाळू तस्करी, अवैध दारू विक्री यांसारख्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगारांचे गुन्हेगारी अभिलेख तयार करण्यात आले आहेत. अशा गुन्हेगारांविरुद्ध यापुढेही MPDA कायद्यान्वये प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल वि. कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लवार, सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंदे तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी कारवाईत सहभाग घेतला. जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील उत्कर्ष देवकुळे, नायब तहसीलदार विलास म्हेत्रे यांनीही स्थानबद्धतेच्या प्रक्रियेत सहभाग घेतला.
सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांविरुद्ध सुरू असलेल्या या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे गुन्हेगारीला आळा घालण्याच्या पोलिसांच्या भूमिकेला अधिक बळ मिळाले आहे.



