ग्राम सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे मुंढेवाडीत केबल चोरांच्या मुसक्या आवळल्या ! सीना नदीकाठावर सापळा रचून दोघांना पकडले

टेंभुर्णी प्रतिनिधी – अमोल मदने
– मोहोळ तालुक्यातील मुंढेवाडी आणि अर्जुनसोंड परिसरातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात तेल घालून झोप उडवणाऱ्या केबल चोरट्यांचा अखेर पर्दाफाश झाला आहे. विहिरी आणि बोअरवेलच्या केबल चोरीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी मुंढेवाडी ग्राम सुरक्षा दल देवदूत ठरले आहे. सीना नदीकाठावर पाळत ठेवून दोन संशयितांना रंगेहाथ पकडण्यात युवकांना यश आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मुंढेवाडी, अर्जुनसोंड परिसरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत शेतीपंपांच्या केबल कापून नेण्याच्या घटना वाढल्या होत्या. लाखो रुपयांचे नुकसान आणि पिकांचे पाणी बंद झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होऊनही चोरटे सापडत नव्हते.
असा रचला सापळा…
ग्राम सुरक्षा दलाला सूचना देण्यात आल्या होत्या की, लाईट येण्यापूर्वी सीना नदीकाठ, बोअरवेल परिसर आणि शेतरस्त्यावर गस्त घाला. त्यानुसार युवकांनी संशयितांवर लक्ष ठेवले.
काल पहाटे विनानंबर दुचाकीवरून दोन इसम सीना नदीच्या दिशेने येताना युवकांना दिसले. अडवून झडती घेतली असता त्यांच्याकडे केबलचा बंडल आढळला. उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने युवकांनी तात्काळ मोहोळ पोलिसांना कळवले.
मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना ताब्यात घेतले. पोलीस खाक्या दाखवताच दोघांनी चार ठिकाणच्या केबल चोऱ्यांची कबुली दिली आहे.
आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून, त्यांच्याकडून मोठ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चोरीचा माल कुठे विकला, यात आणखी कोण सहभागी आहे, याचा तपास सुरू आहे.
पोलीस निरीक्षकांकडून सत्कार
कायदा हातात न घेता चोरट्यांना पोलिसांच्या स्वाधीन केल्याबद्दल मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. दीपक पाटील यांनी ग्राम सुरक्षा दलाच्या युवकांचा पोलीस ठाण्यात सत्कार करून कौतुक केले.
“माझे गाव, माझी जबाबदारी” या संकल्पनेतून सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही रात्रगस्त मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली जात आहे.
या धडक कारवाईमुळे मुंढेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
–



