म्हैसाळच्या पाण्यासाठी डिकसळचे शेतकरी धरणे आंदोलन करणार.
जत भागातील पाणीवाटपामुळे अन्याय होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप; विविध विभागांना परवानगीचे निवेदन

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
डिकसळ : दुष्काळाच्या तीव्र झळा सोसत असलेल्या सांगोला तालुक्यातील डिकसळ परिसरातील शेतकऱ्यांचा म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी संघर्ष आता तीव्र होण्याची चिन्हे आहेत. म्हैसाळ योजनेचे पाणी उपलब्ध असतानाही डिकसळच्या शेतकऱ्यांना अपेक्षित प्रमाणात व नियमितपणे पाणी मिळत नसल्याने जत तालुक्यातील पाणीवाटपामुळे डिकसळकरांवर अन्याय होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
पाण्याच्या प्रश्नावर डिकसळचे शेतकरी एकत्र आले असून, धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या आंदोलनासाठी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन संबंधित विभागांकडे परवानगी मागण्यात येणार आहे. आंदोलनाबाबत कार्यकारी अभियंता, म्हैसाळ प्रकल्प विभाग, सांगली; आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख; माजी आमदार शहाजीबापू पाटील; माजी आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील; जिल्हा परिषद सदस्य संगिता मोटे; पंचायत समिती सदस्य अशोक चोरमुले; तहसील कार्यालय सांगोला; पोलीस निरीक्षक, सांगोला; तसेच गटविकास अधिकारी, सांगोला यांना निवेदन देण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, म्हैसाळ योजनेचे पाणी डिकसळच्या दिशेने येत असताना पाणीवाटपात अडथळे निर्माण होत आहेत. जत तालुक्यातील काही भागात पाण्याचा प्रवाह अडवला जात असल्याचा आरोप करण्यात येत असून, त्याचा परिणाम डिकसळच्या शेतकऱ्यांवर होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दुष्काळी परिस्थितीत पिके वाचविण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज असताना पाणी उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना त्यासाठी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. डिकसळपर्यंत पाणी कोणत्या क्षमतेने पोहोचते, पाणीवाटपाचे वेळापत्रक काय आहे, कोणत्या ठिकाणी अडथळे निर्माण होतात आणि संबंधित लाभक्षेत्राला नियमानुसार किती पाणी मिळणे अपेक्षित आहे, याची स्पष्ट माहिती प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
जत आणि सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये पाण्यावरून संघर्षाची परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी प्रशासनाने हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पाणीवाटपाचा प्रश्न चर्चेतून आणि नियमानुसार सोडविण्याची गरज असताना डिकसळचे शेतकरी आता धरणे आंदोलनाच्या भूमिकेपर्यंत पोहोचले आहेत.
आंदोलनासंदर्भातील निवेदन आणि शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या संबंधित अधिकाऱ्यांकडे दिल्यानंतर प्रशासन या प्रश्नावर कोणती भूमिका घेते, याकडे डिकसळसह परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. म्हैसाळचे पाणी असूनही डिकसळच्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी आंदोलन का करावे लागत आहे, याचे उत्तर आता जलसंपदा विभागाला द्यावे लागणार आहे.



