म्हैसाळच्या पाण्यावरून डिकसळच्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष; न्यायासाठी संघर्षाची चिन्हे
कॅनलमधील पाणी अडविले जात असल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा; आमदार बाबासाहेब देशमुखांसह आजी-माजी आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतीसाठी पाण्याची तीव्र गरज असताना म्हैसाळ योजनेच्या पाण्यावरून डिकसळ परिसरातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याची चर्चा आहे. कॅनलमधून जाणाऱ्या पाण्याची आडवा-अडवी होत असल्याने डिकसळच्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.
डिकसळ परिसरातील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, म्हैसाळ योजनेचे पाणी उपलब्ध असतानाही त्याचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याने शेतीपुढील संकट अधिक गंभीर होत आहे. कॅनलमधील पाण्याच्या प्रवाहाबाबत योग्य नियोजन व समान वाटप झाले नाही, तर परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रश्नावरून वाद टोकाला जाऊ नये, यासाठी संबंधित विभागाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे.
या पार्श्वभूमीवर सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख तसेच आजी-माजी आमदार या पाणीप्रश्नावर नेमकी कोणती भूमिका घेणार? डिकसळच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार कधी घेणार? असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना म्हैसाळ योजनेच्या पाण्याचे योग्य नियोजन, कॅनलची पाहणी आणि पाणीवाटपाची वस्तुस्थिती संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणे गरजेचे आहे. डिकसळच्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळते की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणीही होत आहे.
दरम्यान, “डिकसळकरांना हक्काच्या पाण्यासाठी वारंवार वंचित का राहावे लागते?” अशी चर्चा गावातील शेतकऱ्यांमध्ये सुरू असून, हा प्रश्न आता केवळ पाण्यापुरता न राहता शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न बनत असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाणीवाटपाबाबत स्पष्टता आणणार का, याकडे डिकसळच्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



