सांगोल्यात पत्रकारांच्या पुढाकाराने ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा; पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या हस्ते अभिवादन

सांगोला विशेष प्रतिनिधी: विकास गंगणे मो.9881583935
भारतीय संविधानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणे या उद्देशाने सांगोल्याच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थानिक तरुण पत्रकार बांधवांनी एकत्र येऊन ‘संविधान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला. सांगोला शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक परिसरात सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (PI) राहुल देशपांडे यांच्या शुभहस्ते तसेच पोलीस नाईक प्रमोद गवळी आणि इरफान भाई फारुकी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला.
आजपर्यंत सांगोला शहरात पत्रकार बांधवांच्या वतीने अशा प्रकारे एकत्रितपणे संविधान दिन साजरा करण्यात आला नव्हता. ही ऐतिहासिक उणीव भरून काढत यंदा शहरातील जागरूक आणि संविधानावर निष्ठा ठेवणाऱ्या तरुण पत्रकारांनी पुढाकार घेत या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, पोलीस कर्मचारी आणि उपस्थित पत्रकारांनी हातात भारतीय संविधान घेऊन व महामानवास अभिवादन करत संविधान रक्षणाचा ठाम निर्धार व्यक्त केला.
निमंत्रण देऊनही ‘त्या’ पत्रकारांना संविधान दिनाचा संकोच?
दरम्यान, हा सोहळा सर्वसमावेशक व्हावा यासाठी शहरातील इतर अनेक पत्रकार बांधवांना वैयक्तिक संपर्क साधून व फोनद्वारे आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, भारतीय संविधानाचा सन्मान करणाऱ्या या पवित्र सोहळ्याला निमंत्रण असूनही काही पत्रकारांनी जाणीवपूर्वक दांडी मारल्याने शहरात आश्चर्य आणि तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ज्या संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि लेखणीच्या अधिकारावर ज्यांची पत्रकारिता चालते, त्याच पत्रकारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात येऊन संविधान दिन साजरा करण्यास संकोच किंवा कमीपणा वाटला का? असा संतप्त सवाल आता उपस्थित नागरिक आणि तरुण पत्रकारांमधून विचारला जात आहे.
यंदा तरुण पत्रकारांचा हा पहिलाच प्रयत्न यशस्वीरीत्या पार पडला असून, काहींनी पाठ फिरवली असली तरी संविधानाचा हा जागर यापुढेही असाच अखंड सुरू राहील. पुढच्या वर्षी याहीपेक्षा मोठ्या थाटामाटात, प्रचंड उत्साहात आणि भव्य स्वरूपात संविधान दिन साजरा केला जाईल, असा ठाम विश्वास सर्व आयोजक पत्रकार बांधवांनी यावेळी व्यक्त केला.
या ऐतिहासिक सोहळ्यास पत्रकार सचिन धांडोरे, विकास गंगणे, दिक्षा चंदनशिवे रोहित सूर्यगण, मिनाजभाई खतीब, रवींद्र कांबळे, संतोष साठे, बबन चव्हाण, धोंडीराम कांबळे, निखिल काटे आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



