राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त शुक्रवारी मंगळवेढ्यात ३४ वी पाणी संघर्ष परिषद
तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे: आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
मंगळवेढा : कृष्णा खोऱ्यातील दुष्काळग्रस्त भागातील पाणी प्रश्नावर चर्चा, नियोजन आणि जनजागृती करण्याच्या उद्देशाने शुक्रवार, दिनांक २६ जून २०२६ रोजी दुपारी १ वाजता जोशी मंगल कार्यालय, बायपास रोड, मंगळवेढा येथे ३४ वी पाणी संघर्ष परिषद आयोजित करण्यात आली आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या परिषदेत विशेषतः सांगोले तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.
परिषदेत कृष्णा खोऱ्यातील दुष्काळी तालुक्यांच्या पाणी प्रश्नावर सखोल चर्चा होणार असून, विविध सिंचन योजना, पाणी साठवणूक, जलव्यवस्थापन, जलहक्क आणि शेतीसाठी पाणी उपलब्धतेसंदर्भातील मुद्द्यांवर विचारमंथन होणार आहे. तसेच पाणी वाटपातील समता, जलसंधारण आणि प्रलंबित प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याबाबत भूमिका मांडली जाणार आहे.
यावेळी निमंत्रक वैभव नागनाथ नायकवडी यांच्यासह पाणी परिषदेचे अध्यक्षस्थानी प्रा. शिवाजीराव काळुंगे उपस्थित राहणार आहेत . त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थिती आ. विक्रमदादा सावंत, आ. रोहित आर. आर. पाटील, आ. राजेंद्र अण्णा देशमुख यांच्यासह
मा.प्रा.डॉ. बाबुराव गुरव, मा.प्रा.आर.एस चोपडे, प्रा. बाळासाहेब नायकवडी, श्री. विश्वंभर बाबर, अॅड. सुभाष पाटील, अॅड. सरफराज बागवान, अॅड. भारत पवार,प्रा.दत्ताजीराव जाधव,.सी.पी. गायकवाड, श्री.व्ही.एन. देशमुख, अॅड. बिराप्पा जाधव, श्री. तुकाराम बाबा महाराज यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
टेंभू, म्हैसाळ, ताकारी इ. प्रकल्पाचे पाणी तलाव, नदी, ओढ्यांमध्ये आले आहे. चळवळीच्या पायाभूत घोषणेनुसार प्रत्येकाच्या शेतात पाणी पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी मुख्य कालव्यासह पोट कालव्याची कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. तसेच कार्यक्षेत्रातील तलाव, पाझर तलाव, गाव तलाव व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून देणे आवश्यक आहे. यासाठी भरीव निधीची तरतूद होणे गरजेचे आहे. आपण शांत राहून सरकार निधीची तरतूद करेल असे वाटत नाही आपल्या जनसामर्थ्यांचा रेटा उभा करणे गरजेचे आहे.
१२ वर्षांपूर्वी केंद्रातील व राज्यातील सरकार बदललेली आहेत. राज्य व केंद्रातील सरकारची एकूण चाल बघितली असता अद्यापही शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या दुष्काळी योजनांची पूर्तता याबाबत ठोस पावले उचललेली दिसत नाहीत. जनतेच्या रेट्यामुळे केंद्र व राज्य सरकारने १२ वर्षाच्या काळामध्ये सांगोला शाखा प्रकल्प, टेंभू म्हैसाळ व ताकारी प्रकल्पांसह राज्यातील अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पांपैकी २६ अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रासह देशभर दुष्काळ. कर्जबाजारीपणा, नैसर्गिक आपत्ती यासारख्या संकटांना घाबरुन इथला शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागणे ही राज्यकर्त्यांच्या स्वातंत्रोत्तर ७८ वर्षातील शेती व पाणी विषयाच्या चुकीच्या धोरणामुळे उद्भवलेली समस्या आहे. दुष्काळाचे कायमस्वरुपी निर्मूलन करायचा मार्ग आपणास पद्मभूषण क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी व आ.भाई डॉ. गणपतराव देशमुख यांनी दाखवून दिलेला आहे. त्या मार्गाने पुढे जाऊन उर्वरित समान पाणी वाटपाच्या सर्व कामांच्या पूर्ततेसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात राज्यकर्त्यांना करायला भाग पाडण्यासाठी व राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांचे उतारे कोरे करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या शेती मालाला व दुधाला खर्चावर आधारित हमीभाव मिळवण्यासाठी व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी अमलात आणण्यासाठी सांगोला तालुक्यातील शेतकरी बांधवांनी बंधू-भगिनींनी हजारोंच्या संख्येने ३४ व्या पाणी परिषदेस उपस्थित राहावे, असे आवाहन आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.



