सांगोला पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या पूनम इंगवले तर उपसभापतीपदी शिवसेनेचे अजय सरगर
तब्बल ५५ वर्षानंतर सांगोल्यात सत्तांतर ; पालकमंत्री जयकुमारभाऊ गोरे यांचे ऑपरेशन लोटस यशस्वी

सांगोला ; विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या सांगोला पंचायत समितीच्या तब्बल ५५ वर्षांच्या एकहाती सत्तेला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीने सुरुंग लावला. सभापतीपदी भाजपच्या पुनम इंगवले तर उपसभापतीपदी शिवसेनेचे अजय सरगर यांची निवड करण्यात आली. गुरुवार दि. १२ मार्च रोजी सांगोला पंचायत समिती येथे पार पडलेल्या सभापती आणि उपसभापती पदासाठी झालेल्या निवडीत महायुतीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या दोन्ही उमेदवारांनी ८ विरुद्ध ६ असा दणदणीत विजय मिळवला.
सभापती आणि उपसभापती निवडीच्या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारभाऊ गोरे यांनी सांगोल्यात राबविलेली “ऑपरेशन लोटस” ही मोहीम यशस्वी ठरली आहे. ही मोहीम राबविण्यात भाजप नेते बाळासाहेब एरंडे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे.
१९६२ पासूनच्या सांगोला तालुक्याच्या राजकीय इतिहासात १९७२, १९९५ आणि २०१९ या विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचा पराभव झाला होता. मात्र तरीही १९७२ पासून सांगोला पंचायत समितीवरील शेकापची आजवर अबाधित होती. अर्थात शेतकरी कामगार पक्षाला आजवर पंचायत समिती वरील सत्ता कायम ठेवण्यासाठी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केलेली मदत नेहमीच निर्णायक ठरली होती. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दिपकआबांचे सुपुत्र आणि जवळा जिल्हा परिषदेचे उमेदवार असलेल्या ॲड यशराजे साळुंखे यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागलेले होते. या पराभवात आघाडीत त्यांच्या सोबत असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने कमालीचे क्रॉस वोटिंग केल्यानेच होम पीचवर यशराजे साळुंखे यांचा पराभव झाला होता. ही सल दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात सलत होती. शेकापने क्रॉस वोटिंग करून आपल्याच उमेदवाराचा पराभव केल्याने पंचायत समितीवर असणारी शेकापची सत्ता उलथवून टाकण्याचा निर्धारच साळुंखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता. नुकत्याच पार पडलेल्या साळुंखे पाटील यांच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांनी साळुंखे पाटील यांना थेट भाजपमध्ये जाण्याचा आग्रह केला होता. त्यानुसार पालकमंत्री जयकुमारभाऊ गोरे यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत साळुंखे पाटील यांच्या तिन्ही पंचायत समिती सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. शिवसेनेचे ४ भाजपचा १ आणि साळुंखे पाटील यांचे ३ पंचायत समिती सदस्य अशी ८ ची मॅजिक फिगर भाजप शिवसेना महायुतीने गाठून शेतकरी कामगार पक्षाच्या पंचायत समितीवरील तब्बल ५५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला.
दरम्यान सांगोला पंचायत समितीच्या सभापती पदी प्रथमच भारतीय जनता पक्षाच्या पूनम इंगवले यांची तर उप सभापती पदावर शिवसेनेचे अजय सरगर यांची निवड झाल्यानंतर भाजप शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सांगोला पंचायत समिती परिसरात आणि संपूर्ण तालुक्यात गुलालाची उधळण करून आणि फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला. निवडीनंतर माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयात सभापती आणि उपसभापती दोघांचा सत्कार संपन्न झाला.
चौकट ;
१) देर आये, दुरुस्त आये..!
सांगोला तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला मी आणि दिपकआबांनी एकत्र असावे असे वाटते. गेल्या दीड वर्षापासून आम्ही एकमेकापासून वेगळे होतो. आम्ही एकमेकांच्या विरोधात विधानसभा लढवली. परंतु कुठे ना कुठे आम्ही दोघे एकत्रच असावे असे देवाला सुद्धा वाटत असेल म्हणूनच आज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत.
माजी आमदार शहाजीबापू पाटील
२) विकासाच्या मुद्द्यावर सदैव सोबत
सांगोला तालुक्यातील सामान्य जनतेचा विकास झाला पाहिजे हा माझा नेहमी आग्रह असतो. आगामी काळात जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारभाऊ गोरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा वाहिनी पवार यांच्या माध्यमातून सांगोला तालुक्याचा गतिशील विकास व्हावा ही माझी भूमिका आहे. विकासाच्या मुद्द्यावर आपण सदैव माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासोबत राहू.



